बेळगाव | सीमाभागात मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी विविध संस्था, कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र दुसरीकडे ‘Belagavika’ नावाचे एक सोशल मीडिया खाते सातत्यानं मराठी भाषेविरुद्ध अपमानास्पद, द्वेषमूलक आणि भडकावू पोस्ट करून सीमाभागातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
या खात्याद्वारे जिथे-जिथे मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरली जाते, तेथून ती हटवण्याची मागणी केली जाते. अलीकडेच या पेजवरून बेळगावातील पाटील गल्ली येथे लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील गणेशोत्सवाच्या फलकावर आक्षेप घेत त्यास हटवण्याची मागणी करण्यात आली. गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सांस्कृतिक सणावरही भाषेच्या आधारावर आक्षेप घेणे, ही निंदनीय बाब असून, यामागे हेतूपुरस्सर मराठी समाजात असंतोष निर्माण करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘Belagavika’ पेजवरून सातत्याने मराठी भाषेतील फलक, शाळांचे नावफलक, दुकानदारांच्या पाट्या, आणि सामाजिक कार्यक्रमांना लक्ष्य केले जात आहे. यामुळे सीमाभागात शांततेचा ताण निर्माण होत असून, भाषिक तेढ वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला भाषेचा स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. मात्र ‘Belagavika’ सारखे खाते मराठी भाषिक नागरिकांचे हक्क पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून वारंवार मराठीविरोधी मजकूर प्रसारित करून ते द्वेष पसरवत आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनांनी आणि नागरिकांनी या खात्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संबंधित खाते IT कायद्यान्वये गुन्हेगारी चौकशीस पात्र असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी जोरदार मागणी सीमाभागातून होत आहे.
“मराठी ही केवळ भाषा नसून आमची अस्मिता आहे, आणि तिचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, असा इशारा मराठीप्रेमींनी दिला आहे.