डिसीसी बँक लेबर युनियनच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री तथा अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी आणि त्यांचा पुत्र चिदानंद सवदी यांच्यावर हल्ल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
डिसीसी बँक लेबर युनियनचे अध्यक्ष निंगप्पा करेण्णवर यांनी चिदानंद सवदी यांच्याविरोधात थेट आरोप करताना सांगितले की, “माझ्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने मला घरी बोलावण्यात आले. मात्र तेथे माझ्या डोक्यावर जोरदार हल्ला करून मला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.” या हल्ल्यात निंगप्पा करेण्णवर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर निंगप्पा करेण्णवर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “माझ्या जीवाला धोका आहे. सरकारने तात्काळ मला संरक्षण द्यावे. अन्यथा मला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे.
