बंगळुरू : कोविड-19 काळात करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्य खरेदी व मृत्यू संदर्भातील व्यवहारांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा आयोगाने आपला आंशिक चौकशी अहवाल (Part Report) कर्नाटक सरकारकडे सादर केला आहे. हा अहवाल 30 डिसेंबर 2025 रोजी मुख्य सचिवांना पाठवण्यात आला आहे.
या अहवालात बंगळुरू अर्बन जिल्हा आणि बेळगाव जिल्हा येथील वैद्यकीय खरेदी व्यवहारांचा तपशील देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात कोविड काळात वैद्यकीय खरेदीसाठी एकूण 42 कोटी 19 लाख 29 हजार 198 रुपये खर्च झाल्याची नोंद आयोगाच्या अहवालात आहे. या प्रकरणात 684 फाईल्स तपासण्यात आल्या असून अहवालातील पाने 3630 ते 3826 इतकी आहेत.
तर बंगळुरू अर्बन जिल्ह्यात वैद्यकीय खरेदीवर 63 कोटी 79 लाख 88 हजार 22 रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणात 171 फाईल्स तपासण्यात आल्या आहेत.
सदर चौकशी अहवाल सध्या सार्वजनिक क्षेत्रात जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, कोविड काळातील वैद्यकीय खरेदी प्रक्रियेबाबत जनहित लक्षात घेता तसेच सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुधारणा आवश्यक असल्याचे नमूद करत, राज्य सरकारने हा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करावा, अशी शिफारस आयोगाने केली आहे.
या अहवालामुळे कोविड काळातील वैद्यकीय खरेदी व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आगामी काळात राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
