विसर्जन मिरवणुकीत ‘जय महाराष्ट्र’ गाण्यावरून युवकाला क्षमा मागण्याची सक्ती – मराठी संघटनांचा संताप

विसर्जन मिरवणुकीत ‘जय महाराष्ट्र’ गाण्यावरून युवकाला क्षमा मागण्याची सक्ती – मराठी संघटनांचा संताप

बेळगाव प्रतिनिधी :
बेळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘जय महाराष्ट्र’ हे गाणे लावल्याने एका युवकाला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावल्याची घटना समोर आली असून, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मराठी बांधवांत तीव्र असंतोष पसरला आहे तर प्रशासन व राज्य सरकारवर नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटील गल्लीच्या गाड्यावर हे गाणे लावण्यात आले होते. पारंपरिक मराठी ढोल-ताशांच्या गजरात ‘जय महाराष्ट्र’ गाणे वाजत असताना काही कानडी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर युवकाला क्षमा मागण्यास भाग पाडण्यात आले. विशेष म्हणजे, या घटनेबाबत सोशल मीडियावरील काही कानडी संघटनांच्या फेसबुक पेजवरून वाद पेटविण्यात आला असला तरी, पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

मराठी संघटनांनी यावर संताप व्यक्त करत “भारतीय संविधान आम्हाला आमची भाषा आणि संस्कृती जपण्याचा अधिकार देते. मग ‘जय महाराष्ट्र’ गाणे वाजविणे गुन्हा कसा ठरते? कर्नाटक वेगळे राष्ट्र आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संविधानाच्या अनुच्छेद २९ मध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतःची भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सीमाभागात मराठी गाणी लावणे हा गुन्हा नसून मराठी जनतेच्या भावनांचा सन्मान आहे, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

मराठी संघटनांचा आणखी एक ठाम मुद्दा असा आहे की, “गणेशोत्सव हा मुळात मराठी समाजातून उद्भवलेला सण आहे. महाराष्ट्रातूनच हा परंपरेने सर्वत्र पसरला. मग कर्नाटकात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना ‘जय महाराष्ट्र’ गाण्यावर एवढा आकस का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीसह विविध मराठी संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून, याला मराठी समाजाचा अपमान ठरवले आहे. आगामी काही दिवसांत या प्रश्नावरून आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − 1 =

error: Content is protected !!