बेळगाव, प्रतिनिधी :
बेळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात “बी एम ग्रुप महिला गृह उद्योग स्वयंरोजगार समूह” या नावाखाली महिलांना घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणात शहापूर पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (सध्या पाटील गल्ली, खासबाग, बेळगाव; कायम पत्ता – जालोळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या व्यक्तीने महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले.
तो प्रत्येक महिलेकडून आयडी तयार करण्याच्या नावाखाली ₹2,500 इतकी रक्कम घेत असे आणि २० दिवसांनंतर ₹3,000 पगार मिळेल, तसेच पुढील सहा महिन्यांपर्यंत रोखरहित पद्धतीने काम व पगार दिला जाईल असे सांगत असे.
फिर्यादी व तिच्या ओळखीतील महिलांकडून एकूण ₹2,02,500 इतकी रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र ठरलेल्या वेळेनंतर पैसे परत न करता कोळेकर फरार झाला. त्याने अशा प्रकारे अनेक महिलांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
