बेळगाव : सिंगिनकोप येथील स्वाती संतोष कुंभार हिच्या कौलारू घराला लागलेल्या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर विविध स्तरांतून तिला मदतीचा हात पुढे केला जात आहे. बेळगाव येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टकडून मदत मिळाल्यानंतर आता समाजातूनही सढळ हस्ते मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
विजयनगर येथील योगेश फडतरे आणि मनीष हुलजी यांनी रविवार (दि.१५) रोजी स्वाती कुंभार हिला भेट देत प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनीही स्वाती कुंभार हिला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
इदलहोंड ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा कुंभार तसेच खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरू कुंभार हेही स्वाती कुंभार हिला मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कुंभार समाजातील या महिलेला संकटातून सावरण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
