बेळगाव – गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. २२ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगाव शहरातील सामाजिक आणि महिलांच्या चळवळीत कार्यरत असलेल्या एका कार्यसम्राज्ञेचा अंत झाला.कॉ. सातेरी या भारतीय महिला फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या माजी अध्यक्षा, राज्य शाखेच्या अध्यक्षा, तसेच राष्ट्रीय मंडळाच्या सदस्या होत्या. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्याचा ठसा बेळगावमधील अनेक संस्थांवर होता.त्यांनी आपल्या मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची इच्छाशक्ती बाळगत जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. या संकल्पानुसार संस्थापक आणि अध्यक्ष मदन बामणे यांच्या पुढाकाराने जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागास देहदान, बिम्सच्या नेत्र विभागास नेत्रदान, तर केएलई रोटरी त्वचा बँकेस त्वचा दान करण्यात आली.या प्रसंगी झालेल्या छोटेखानी शोकसभेला कॉ. आनंद मेणसे आणि ज्येष्ठ नेते किरण ठाकूर यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात त्यांनी कला सातेरी यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत, मृत्यूनंतरही देहदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी जपल्याचे गौरवोद्गार काढले.या प्रसंगी अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, वकील मंडळी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कॉ. कला सातेरी यांच्या पश्चात पती माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, मुलगा अॅड. अजय सातेरी, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्मृतीला मन:पूर्वक आदरांजली.
कॉ. कला नागेश सातेरी यांचे मरणोत्तर देहदान : समाजासाठी दिले अमूल्य योगदान
