बंगळूर: कर्नाटक स्टेट नॅचरल डिसास्टर मॉनिटरिंग सेंटर (KSNDMC) कडून राज्यभरात, विशेषतः उत्तर अंतर्गत कर्नाटकात, १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान लक्षणीय थंडी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार थंड वारे वाहू लागल्याने अनेक उत्तरी जिल्ह्यांवर थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
KSNDMC नुसार खालील जिल्ह्यांत अतिशय गार वाऱ्यांचा प्रभाव जाणवणार आहे—
बिदर, कलबुर्गी, विजयपूर, बागलकोट, बेळगाव
या भागातील नागरिकांनी विशेषतः रात्री व पहाटेच्या सुमारास अत्यंत थंडीतून बचावासाठी उबदार कपडे वापरणे, अनावश्यक बाहेर पडणे टाळणे याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकातील कलबुर्गी, बिदर, रायचूर, कोप्पळ या भागांत आधीच तापमानात मोठी घसरण अनुभवायला मिळत आहे. रात्रीचे तापमान अनेक ठिकाणी १४°से. पर्यंत खाली आले असून गारठवणाऱ्या थंडीत लोक घरात थांबणे पसंत करत आहेत. गावागावांत लोकांनी स्वेटर, शाली, मफलर, वुलन कॅप्स बाहेर काढले असून अनेक ठिकाणी लोक बोनफायर करून उब घेताना दिसत आहेत. बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात गरम चहासाठी नागरिकांची सकाळची गर्दी वाढली आहे.
बिदर कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये तापमान १०°से. पर्यंत खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कर्नाटकातील सध्याचे किमान तापमान
- बिदर: 9.5°C
- बेळगाव: 11.2°C
- धारवाड: 11.6°C
- विजयपूर: 11°C
- गडग: 13.2°C
- रायचूर: 14°C
- कलबुर्गी: 15.1°C
- चित्रदुर्ग: 15.1°C
ही आकडेवारी सध्याच्या ऋतुच्या सरासरी तापमानापेक्षा मोठी घसरण दाखवते, ज्यामुळे या वर्षी हिवाळा लवकरच दाखल झाल्याचे संकेत मिळत आहेत.
‘
