बेळगाव – (प्रतिनिधी)
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना व्यस्त वेळेत बेळगाव शहर हद्दीत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी ठाम मागणी सिटीझन्स कौन्सिल, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कौन्सिलने पोलीस आयुक्त श्री. भुशन जी. बोर्से, आयपीएस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या तिसरे व चौथे रेल्वे गेट बांधकामामुळे बंद असल्याने संपूर्ण वाहतूक काँग्रेस रोडवरील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटवर अवलंबून आहे. टिळकवाडीच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे हे मार्ग शहरातील प्रमुख दळणवळणाचे केंद्र असल्याने दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
शहरात १७ हून अधिक शाळा, २० पेक्षा जास्त महाविद्यालये, उद्यमबाग औद्योगिक वसाहत (दररोज १० हजारांहून अधिक कामगार), ९ प्रमुख रुग्णालये, शहरातील रेल्वे स्थानकातून दररोज धावणाऱ्या २८ पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या, दोन प्रमुख बसस्थानके, २३ पेक्षा जास्त बस थांबे तसेच चित्रपटगृहे, मॉल्स, हॉटेल्स व व्यापारी संकुले याच मार्गावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शहरात दररोज १० हजारांहून अधिक प्रवासी रिक्षा, ८० हजार खासगी कार आणि सुमारे १.५ लाख दुचाकी वाहने रस्त्यावर असतात. अशा परिस्थितीत जड वाहनांची मुक्त वाहतूक ही विद्यार्थ्यांपासून रुग्ण, पादचारी व आपत्कालीन सेवांसाठी गंभीर धोका ठरत असल्याचे कौन्सिलने स्पष्ट केले आहे. नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातांचा उल्लेख करत, हे अपघात भविष्यात टाळण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सिटीझन्स कौन्सिलने निवेदनात शहर हद्दीत जड वाहनांवर तात्काळ किंवा वेळनिहाय बंदी, काँग्रेस रोड व रेल्वे गेट परिसरात पूर्ण निर्बंध, बायपास मार्गांकडे जड वाहनांची वळवणूक, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व रेल्वे क्रॉसिंगजवळ विशेष वाहतूक नियंत्रण तसेच वाहतूक पोलीस व आरटीओकडून कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
रेल्वे गेटचे सुरू असलेले काम, वाढती वाहनसंख्या आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता पोलीस व जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन कौन्सिलने केले आहे.
हे निवेदन सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, विकास कलघटगी, मुकेश खोड़ा, नितेश जैन व राजू पालीवाला यांच्या वतीने सादर करण्यात आले.
