चव्हाट गल्लीत बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

चव्हाट गल्लीत बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

बेळगाव : चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार सध्या प्रगतीपथावर असून, या अंतर्गत बुधवारी सकाळी ११ वाजता मंदिराच्या चौकट उभारणीचा भव्य आणि विधिवत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लाखो रुपये खर्चून मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत असून, या मंगलप्रसंगी पी.बी. रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने मंदिर परिसरात आणण्यात आली.

चौकट मिरवणुकीची सुरुवात चव्हाट गल्ली हद्दीतून झाली. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीगीतांच्या निनादात आणि ‘गोविंदा-गोविंदा’च्या जयघोषात परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. ‘व्यंकटेश स्तोत्रा’च्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान बालाजी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अरुण धमुने यांनी भूषविले. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत होते. समोरील चौकटीचे पूजन विश्वास धुराजी, विश्वजित हसबे आणि दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. गाभाऱ्याच्या चौकटीचे दीपप्रज्वलन दिगंबर पवार, सुनील जाधव, चंद्रकांत कणबरकर, जोतिबा नाईक, मोहन किल्लेकर आणि विनायक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर चव्हाट गल्लीतील पंच कमिटी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘चौकट पूजन’ सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक तसेच होम-हवन करण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात चौकटीचे पूजन करण्यात आले.

या मंगलप्रसंगी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आणि सोहळ्याला उपस्थिती लावली होती. चव्हाट गल्लीतील परंपरेनुसार चौकटीला गंध-अक्षता लावून फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. हा सोहळा मंदिराच्या पुढील बांधकामाची नांदी मानला जात असून, भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सोहळ्यानंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर ट्रस्टतर्फे उपस्थित सर्व मान्यवर आणि भाविकांचे आभार मानण्यात आले. यावेळी श्री व्यंकटेश मंदिर पंच कमिटी अध्यक्ष अरुण धमुणे यांच्यासह लक्ष्मण धमुणे, चंद्रकांत घगणे, राजाराम धमुणे, मोहनसिंग टिंबरे, प्रकाश धमुणे, प्रतापसिंह वंटमुरी, दिगंबर धमुणे, गजानन शंकपुरे तसेच भजनी मंडळाचे कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + fourteen =

error: Content is protected !!