बेळगाव : दिवाळीच्या निमित्ताने सकाळतर्फे आयोजित ‘चला किल्ले बनवूया’ या उपक्रमातील बक्षीस वितरण सोहळ्यास शहर व ग्रामीण भागातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कपिलेश्वर मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य प्रायोजक आनंद अकनोजी व अजित जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.
सकाळचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय होनगेकर यांनी किल्ला परंपरा ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून इतिहासाशी जोडणारी मूल्यवान परंपरा असल्याचे सांगितले. किल्ले बांधण्याच्या स्पर्धेमुळे मुलांना शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि शौर्याची ओळख होते, असे त्यांनी नमूद केले.
युवा व्याख्याता साक्षी गोरल यांनी शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अडचणींच्या काळात गड-किल्ल्यांना भेट दिल्यास उभारी मिळते, असे सांगत त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्ती व आत्मविश्वास वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमात शार्दुल केसरकर यांनी पोवाडा सादर केला. मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
निकाल
ग्रामीण विभाग :
प्रथम – शिवदैवत किल्ला ग्रुप, तूरमुरी
द्वितीय – मराठा वॉरियर्स, काकती
तृतीय – बाल युवक मंडळ, खादरवाडी
उत्तेजनार्थ – छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रतिष्ठान (लक्ष्मी नगर), शिव समर्थ युवक मंडळ (लक्ष्मी नगर)
शहर विभाग :
प्रथम – बाल शिवाजी युवक मंडळ, हट्टीहोळी गल्ली
द्वितीय – हनुमान युवक मंडळ, अनगोळ
तृतीय – नरवीर तालीम मंडळ, जुने बेळगाव
उत्तेजनार्थ – जय गणेश युवक मंडळ (सोनार गल्ली), शिव सम्राट युवक मंडळ (शहापूर)
सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
