बेळगाव प्रतिनिधी
अर्थकारणावर आपली भक्कम पकड निर्माण करत कॅपिटल वन संस्थेने गेली अनेक वर्षे शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविला आहे. गेली १८ वर्षे एस.एस.एल.सी. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी व्याख्यानमाला ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन नेताजी जाधव यांनी केले.
ते यंदा आयोजित करण्यात आलेल्या एस.एस.एल.सी. मार्गदर्शन शिबिराच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती कॉलेजच्या सभागृहात बोलत होते. या शिबिराचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले. दीर्घकाळ सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात गेली सतरा वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेस शाळा व विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असून परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जाण्याचे धाडस निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, विज्ञान विषयाचे शिक्षक एस. व्ही. भातकांडे, सविता पवार व शिवाजीराव अतिवाडकर उपस्थित होते. मागील वर्षीच्या शिबिरातून विविध विषयांत उच्चांक प्राप्त करणाऱ्या तसेच सरासरी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या शिबिरातील शिबिरार्थींनीही आपल्या मनोगतातून उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज पाटील, एस. व्ही. भातकांडे, वसंत पाटील, सी. आय. पाटील, संजीव कोष्टी, संध्या सुतकट्टी, जोतीबा पाटील, पी. आर. पाटील, एम. व्ही. भोसले व सुनील लाड यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री लक्ष्मीकांत जाधव, शाम सुतार, सेक्रेटरी स्नेहल कंग्राळकर, कर्मचारी वर्ग व पिग्मी कलेक्टर उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. व्ही. भातकांडे यांनी केले.
