कॅपिटल वनची एसएसएलसी व्याख्यानमाला उत्साहात सुरू
बेळगाव, १६ नोव्हेंबर २०२५
कॅपिटल वन संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सलग १७व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या एसएसएलसी व्याख्यानमालेचा उद्घाटन सोहळा रविवारी ज्योती महाविद्यालय, कॅम्प येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव तथा प्रमुख पाहुणे विक्रम पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. “पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळणे अत्यावश्यक आहे. अशा व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते परीक्षेला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक शरद पाटील, मराठी विषयाचे व्याख्याते सी. वाय. पाटील, बी. एम. पाटील, तसेच मागील वर्षी उत्तुंग यश मिळवलेला विद्यार्थी कु. आशुतोष देसुरकर आणि संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे उपस्थित होते.
चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना व्याख्यानमालेचे महत्त्व स्पष्ट केले. “एसएसएलसी ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी परीक्षा आहे. निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जा, पूर्ण क्षमतेने झोकून द्या आणि यशस्वी भविष्याचा पाया रचा,” असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक, पालकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली आणि व्याख्यानमालेला औपचारिक सुरुवात झाली.
