श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या वतीने आयोजित वसंत हंकारे यांचे “चला जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना” या विषयावरील समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आरपीडी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील फलक बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात लावण्यात आला असून, फलकाच्या वरच्या बाजूस कन्नड तर खालच्या बाजूस मराठी मजकूर आहे.
मात्र, फलकावर कन्नड मजकूर असतानाही “बेळगावीका” नावाच्या सोशल मीडिया खात्यावरून सदर फलक कन्नड संघटनांनी फाडावा, असे उघड आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पेज सातत्याने बेळगाव शहरातील भाषिक सलोखा बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या सोशल मीडिया पेजवरून सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी भाषिकांना हद्दपार करण्याच्या उद्देशाने द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि कृतीस प्रवृत्त करणारे संदेश वारंवार पोस्ट केले जात असून, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अनेक वेळा या पेजवरून आवाहन झाल्यानंतर मराठी फलक फाडण्यात आल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या रक्तदान शिबिरासंदर्भातील मराठी फलकांवरही या पेजवरून मराठीविरोधी भूमिका घेत फलक हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काही कन्नड संघटनांनी ते फलक पाडले होते. त्याच ठिकाणी श्रीराम सेना हिंदुस्तान यांनी तत्काळ कन्नड फलक लावून कोणताही भाषिक द्वेष नसल्याचे स्पष्ट केले होते.
तरीही “बेळगावीका” सारखी पेज आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांकडून सातत्याने मराठी भाषिकांविरोधात द्वेष पसरवण्याचे कार्य सुरू असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे बेळगावमध्ये कन्नड-मराठी ऐक्याचे चित्र रंगवले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, एरवी मराठी भाषिकांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांवर प्रशासन तातडीने कारवाई करते; मात्र उघडपणे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या सोशल मीडिया खात्यांवर आणि संघटनांवर मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एकंदरीतच, सीमाभागात कन्नड भाषेला सन्मान दिला जात असतानाही मराठी भाषिकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, यावर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
