चंदगड, 30 जुलै 2025 – चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज एका वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिस्त मंडळाने आमदार पाटील यांना शुभेच्छा देत समाजोपयोगी भेटवस्तू देण्याचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष अधिकारी श्री. मंगेश चिवटे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग बेळगावचे ज्येष्ठ नेते श्री. रमाकांत कोंडुस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. सीमाभागातील वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या हस्ते पाच व्हीलचेअर विकलांग रुग्णांसाठी भेट स्वरूपात आमदार साहेबांना प्रदान करण्यात आल्या.
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्याला अनुसरून या वाढदिवशी फुलांचे गुच्छ किंवा शाल, श्रीफळ देण्याऐवजी समाजोपयोगी स्वरूपात रुग्णसेवेसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमात चंदगड भाजपचे अध्यक्ष शांताराम (बापू) पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्यवर्ती कार्यकारिणीतील जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अनिल अमरोळे, लक्ष्मण किल्लेकर, सागर पाटील, कपिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या समाजहिताच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, सीमाभागात समाजासाठी विधायक कार्याचा एक नवा आदर्श प्रस्तुत करण्यात आला आहे.