भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक
बेळगाव (प्रतिनिधी) – भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यात अव्वल ठरून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता या शाळेच्या विद्यार्थ्यांची तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण २१ शाळांमधून लव्ह डेल सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. रायचूर येथे झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी प्रभावी सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली.
विजेत्या समूहात अद्विती शेठ, त्रिशाना मित्रा, रिषिका कोंगवाड, राघवी गस्ती, अदिती उंगेर, आकांक्षा नाईक, लाईबाह के. आणि हृत्विका कंग्राळकर यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक विनायक मोरे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
तसेच “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धेतही बेळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. वरिष्ठ विभागात भरतेश इंग्रजी माध्यम शाळेचे प्रसन्ना ए. आणि यश धर्मोजी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर कनिष्ठ विभागात संत मीरा स्कूल, हिंडलगा येथील विघ्नेश मन्नुरकर आणि वैष्णव मनवाडकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
रायचूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी पुरुषोत्तमदास इनानी, प्रांताध्यक्ष एस. एस. हिरेमठ, डॉ. आनंदतीर्थ फडणीस, संघटन सचिव विनायक घोडेकर, बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे, तिरुपती जोशी, स्वामीराव देशपांडे, अक्षता मोरे यांसह विविध शाखांचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्यावतीने सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, तिरुपती येथे होणाऱ्या आगामी दक्षिण विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
                     
             
                                         
                                        