बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘होम मिनिस्टर’ या विशेष स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांनी सादर केलेल्या वंदे मातरम्ने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रा. अरुणा नाईक यांनी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले, तर सुखदा देशपांडे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महिला दिनानिमित्त गेली २९ वर्षे सेवाकार्य करणाऱ्या बेळगाव भाविपच्या सर्व महिला सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘होम मिनिस्टर’ या खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्साहाने सहभागी होत विविध खेळांचा आनंद लुटला. या स्पर्धेत नंदिता गिलबिले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘होम मिनिस्टर’चा किताब पटकावला. त्यांना आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा हल्लप्पनवर यांनी केले, तर ज्योती प्रभू यांनी आभार मानले. यावेळी रजनी गुर्जर, विद्या इटी, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, मंगल कोलेकर, नंदिनी पाटील, ज्योत्स्ना गिलबिले, मंगल कुलकर्णी, गीता बागेवाडी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डॉ. जे. जी. नाईक, विनायक घोडेकर, के. व्ही. प्रभू, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, नामदेव कोलेकर, अमर देसाई, पी. जे. घाडी आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
