बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन व सीमा लढ्याच्या पुढील वाटचालीबाबत सखोल विचारविनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज), बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी नियोजित कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत सीमाभागात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात, सीमा लढ्याच्या विविध पैलूंवर कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन पुढील कार्याची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण व घटक समितीचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अँड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील, मोनापा पाटील व लक्ष्मण होनगेकर यांनी केले आहे.
