बेळगाव │ बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर व आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी देवेन बामणे याची जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी मोहाली, चंदिगड येथे पार पडली. देवेन गेल्या आठ वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. जागतिक स्तरावर स्थान मिळवण्यासाठी त्याने रात्रंदिवस कसून मेहनत घेतली होती.
स्पीड सालोम या प्रकारात झालेल्या या निवड चाचणीमध्ये त्याने आपले कौशल्य सिद्ध केले असून आता तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा दिनांक 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 दरम्यान सिंगापूर येथे होणार आहे.
देवेनच्या या यशाबद्दल बेळगाव जिल्हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याचे आई-वडील – ज्योती बामणे व विनोद बामणे यांनी त्याला सतत प्रोत्साहन देत त्याच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या यशासाठी के.एल.ई. सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, श्री. राज घाटगे, कर्नाटका रोलर स्केटिंग असोसिएशनचे सेक्रेटरी इंदूधर सीताराम, आर.एल.एस. कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, बेळगाव जिल्हा स्केटिंग असो. अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी देवेनला शुभेच्छा दिल्या.
बेळगावचा देवेन बामणे हा आता सिंगापूरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे.
