बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव शहराने पुन्हा एकदा मानवता, सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोख्याची उज्ज्वल परंपरा जिवंत ठेवणारी हृदयस्पर्शी घटना अनुभवली आहे. धर्माच्या सीमा ओलांडून माणुसकीचे नाते जपणारी ही घटना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
भाग्यनगर येथील हिंदू महिला शांताबाई गेली सुमारे वीस वर्षे गांधीनगर परिसरातील एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी वास्तव्यास होत्या. संबंधित कुटुंबाने शांताबाई यांची आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेमाने, सन्मानाने व आपुलकीने काळजी घेतली. वृद्धत्व व दीर्घकालीन आजारामुळे उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.
शांताबाई यांच्या निधनाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून माजी महापौर विजय मोरे यांनी सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह सन्मानपूर्वक सदाशिव नगर स्मशानभूमी येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
अॅलन विजय मोरे, निसार, शमशेर, संजय कोलकर तसेच सदाशिव नगर स्मशानभूमीतील कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने शांताबाई यांचे अंत्यसंस्कार पूर्णपणे हिंदू धर्मीय रितीरिवाजांनुसार पार पाडण्यात आले. यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारापुरती मर्यादित न राहता, बेळगावच्या सामाजिक जीवनातील मानवता, बंधुता आणि परस्पर सन्मानाच्या मूल्यांचे जिवंत उदाहरण ठरली आहे. धर्म, जात व पंथ यापलीकडे जाऊन माणुसकी जपणारे बेळगाव शहर पुन्हा एकदा आदर्श ठरले आहे.
