बैलहोंगल तालुक्यात कौटुंबिक वादातून भीषण घटना. पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून घेतला गळफास; दोन मुले पोरकी

बैलहोंगल तालुक्यात कौटुंबिक वादातून भीषण घटना.                   पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून घेतला गळफास; दोन मुले पोरकी

बैलहोंगल (प्रतिनिधी) बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तुरकर्शिगिहळ्ळी (Turakarsheegihalli) गावात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत यल्लव्वा कांबळी (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला असून, पती शिवप्पा सन्नबसप्पा कांबळी (वय ५०) याने पत्नीचा खून केल्यानंतर आत्महत्या केली. ही घटना सकाळी सुमारे ८.४५ ते ९ वाजताच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यल्लव्वा या वारंवार आपल्या माहेरी मेकलमरडी गावात जात असल्यावरून पती शिवप्पा यांच्यात वाद होत होता. काही दिवसांपूर्वी यल्लव्वा यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे दोघेही मेकलमरडी येथे गेले होते. यल्लव्वा मंगळवारी सासरी परतली होती. शुक्रवारी सकाळी आईच्या निधनानंतरचे धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी पुन्हा माहेरी जाण्याची तयारी करत असताना पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

हा वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात शिवप्पा याने कुऱ्हाडीने यल्लव्वाच्या मानेवर जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या यल्लव्वाचा रक्तस्राव होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर शिवप्पा याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

या दाम्पत्याला दोन मुले असून, एक मुलगा मागील दिवशी नातेवाईकांकडे गेला होता, तर दुसरा मुलगा नेहमीप्रमाणे सकाळी बेळूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामावर गेला होता. त्यामुळे घटनेच्या वेळी घरात फक्त पती-पत्नीच उपस्थित होते.

आई-वडिलांच्या एकाच दिवशी मृत्यूमुळे दोन्ही मुले मानसिक धक्क्यात असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + four =

error: Content is protected !!