बेळगाव: बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेला ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी व्यासपीठावर शोभा लोकूर, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई तसेच सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात शोभा लोकूर यांनी नर्मदा परिक्रमेबाबत सविस्तर व तपशीलवार माहिती देत, तन व मन एकत्र करून परिक्रमा करणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांना उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
मनोरंजनाच्या भागात नारायण कोरडे, रविंद्रनाथ जुवळी आणि विजय बांदिवडेकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी तसेच अभंग सादर करून वातावरण रंगतदार केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुरेन्द्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर कार्यक्रमाची सांगता शिवराज पाटील यांनी आभार प्रदर्शनाने केली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत समाधान व्यक्त केले.
