बेळगाव │ बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांच्या सहवासात आनंदाचा सोहळा साजरा केला. या भेटीदरम्यान महिला आणि पुरुष मिळून सुमारे ४० सभासदांनी गाणी गाऊन, नृत्य करून आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करून वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
विशेष म्हणजे, वृद्धाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सर्वजण आनंदमय वातावरणात समरस झाले. या कार्यक्रमात डॉ. बी. जी. शिंदे यांनी ‘शोले’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद अभिनयासह सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच रविंद्र कुंभोजकर आणि मनिषा कुंभोजकर यांनी वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सेवाभावी वृत्तीने काम करणारे शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि मारिया मोरे यांचा सत्कार अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विजय मोरे यांनी वृद्धाश्रमातील अनुभव आणि कार्याची माहिती दिली.
व्यासपीठावर उपाध्यक्ष के.एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव कुलकर्णी यांनी केले. स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले तर आभार शिवराज पाटील यांनी मानले.
