बेळगाव येथील दिव्यांग मुलांच्या शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

बेळगाव येथील दिव्यांग मुलांच्या शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार


बेळगाव : गेल्या दहा वर्षांपासून गतिमंद मुलांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून नवा उजाळा देणाऱ्या कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे शाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
२०१४ साली स्थापन झालेल्या कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेत सुरुवातीपासूनच गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे. औपचारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यावर विशेष भर दिला जातो. भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असून, या सर्व कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरील परीक्षण समितीने घेतली आहे.
दिव्यांग मुलांच्या शिक्षण, काळजी व कल्याणासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवांमुळे कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डिफेन्स डेच्या निमित्ताने मंगळवारी (ता. १६) दिल्ली येथील डिफेन्स इस्टेट भवनात आयोजित भव्य कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वतीने माजी सीईओ राजीव कुमार, आरएमओ डॉ. आर. बी. अण्णागोळ तसेच कॅन्टोन्मेंट स्नेहालयच्या मुख्याध्यापिका दिपाली नरेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा राष्ट्रीय पुरस्कार दिव्यांग मुलांना समावेशक शिक्षण, विशेष काळजी आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेने केलेल्या अनुकरणीय कार्याचे प्रतीक आहे. तसेच हा पुरस्कार संस्थेची वचनबद्धता, कर्मचाऱ्यांचे समर्पित प्रयत्न आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा ठोस पुरावा मानला जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्याध्यापिका दिपाली पाटील यांनी, येणाऱ्या काळातही दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 8 =

error: Content is protected !!