बेळगाव शहरात क्रमांक प्लेट नसलेल्या तसेच दोषपूर्ण क्रमांक प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण १२६ दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. संबंधित वाहनचालकांकडून एकूण ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अनेक वाहनांच्या क्रमांक प्लेट्स जागीच दुरुस्त करून घेण्यात आल्या.
शहरातील वाहतूक शिस्त अबाधित राहावी आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यानुसार क्रमांक प्लेट बसवाव्यात व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
