अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ३७ वर्षांची शिक्षा; १.२५ लाख दंड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ३७ वर्षांची शिक्षा; १.२५ लाख दंड

बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली असून एकूण ३७ वर्षांची सक्तमजुरी आणि १ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी रुतॆश अनिल बोसले (वय २२, रा. गणेश चौक, कंग्राळ बी.के., ता. व जि. बेळगाव) याने दिनांक १ जून २०२५ रोजी शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला लाडू देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले. त्या वेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा मुलगी शाळेला सुट्टी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला घरी बोलावून अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर काकती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११८/२०२५ नोंद करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६५(२), ११५(२), ३५१(३), २३८ तसेच पॉक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश पी. शिंगे यांनी तपास करून आरोपीला १० जून २०२५ रोजी अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, एफटीएससी–०१, बेळगाव (सी.सी. नं. ४९०/२०२५) येथे झाली. माननीय न्यायाधीश सी.एम. पुष्पलता यांनी दिनांक ६ मार्च २०२६ रोजी निकाल देत आरोपीला एकूण ३७ वर्षांची शिक्षा आणि १,२५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

सरकारतर्फे पब्लिक प्रॉसिक्यूटर एल. व्ही. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पोलीस निरीक्षक सुरेश पी. शिंगे, पीएसआय मंजुनाथ हुलकुंद, पीएसआय मृतुंजय मठद, तपास सहाय्यक यल्लप्पा कोच्चरगी, धरप्पा घनन्नवर तसेच कोर्ट मॉनिटरिंग सेलचे राजू एस. लमाणी आणि इतर कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत आरोपीला शिक्षा होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणातील तपास पथकाच्या कार्याचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − four =

error: Content is protected !!