बेळगावात अनंतराव जांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव

बेळगावात अनंतराव जांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव

बेळगाव : ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते अनंतराव जांगळे यांच्या कार्याचा गौरव करणारे पुस्तक प्रकाशित करावे, त्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करीन, असे प्रतिपादन माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी यांनी केले.

गेल्या २३ फेब्रुवारी रोजी अनंतराव जांगळे यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवारी सायंकाळी हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटीच्या कार्यालयात आयोजित शोकसभेच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य नंदीहळळी होते. प्रारंभी त्यांच्या व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते जांगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जांगळे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्य केले होते. त्या संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने शोकसभेस उपस्थित होते. व्यासपीठावर पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, दैवज्ञ बँकेचे उपाध्यक्ष मंजुनाथ शेठ, तुकाराम बँक व मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगळे, हिंद सोशल क्लबचे संगोळी तसेच आनंदवाडीचे पंच शशिकांत रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना अनंत लाड यांनी जांगळे यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर अनेकांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली. जायंट्स सखीच्या अध्यक्ष सुलक्षणा शिरोळकर, बसवेश्वर बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, मराठा समाज सुधारणा मंडळाचे शिवराज पाटील, संजीवनी फाउंडेशनचे मदन बामणे, शहापूर मुक्तिधामचे श्रीकांत काकतीकर, जायंट्स ग्रुपचे डॉ. विनोद गायकवाड, ईश्वर लगाडे आदींनी जांगळे यांच्या कार्याची आठवण करून दिली.

“अनंतराव जांगळे हे मितभाषी पण अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ते होते. जायंट्स ग्रुपच्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला,” असे लक्ष्मण शिंदे म्हणाले. मंजुनाथ शेठ यांनी, “शांत स्वभावाचे, नेहमी हसतमुख राहून काम करणारे जांगळे यांच्या निधनाने आम्ही एक समर्पित कार्यकर्ता गमावला आहे,” असे सांगितले. शशिकांत रणदिवे यांनी, “आनंदवाडी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे जांगळे हे शून्यातून विश्व उभे करणारे कार्यकर्ते होते,” असे मत व्यक्त केले. नेताजी जाधव यांनी त्यांना अजातशत्रू संबोधत सार्वजनिक वाचनालय व मराठा समाज सुधारणा मंडळातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

प्रकाश मरगळे यांनी १९९५ पासूनचा सहवास सांगत, “गेल्या २५ वर्षांत त्यांच्या सोबत काम करताना त्यांनी कधीही गैरवर्तन केले नाही. ‘स्कूल ऑफ कल्चर’मध्ये सादर झालेली नाटके आणि कार्यक्रम हे त्यांच्या कार्याची साक्ष आहेत,” असे नमूद केले.

जांगळे यांच्या सून अमृता अभिजीत जांगळे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करताना, “त्यांनी आम्हाला कधीही सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणूनच आपुलकी दिली,” असे सांगितले. अखेरीस जांगळे यांचे चिरंजीव अभिजीत यांनी, “वडिलांची अपूर्ण स्वप्ने आम्ही पूर्ण करू आणि त्यांचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवू,” असा निर्धार व्यक्त केला.

दोन मिनिटे शांतता पाळून स्वर्गीय अनंतराव जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जायंट्स ग्रुप, तुकाराम बँक, सार्वजनिक वाचनालय, हिंद हाउसिंग सोसायटी, आनंदवाडी नागरिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून जांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + one =

error: Content is protected !!