बेळगावचे थोर उद्योगपती बाळासाहेब भरमगौडा पाटील यांचे निधन
बेळगावातील हिंदवाडी येथील रहिवाशी, दानशूर उद्योजक आणि बी. टी. पाटील (पॅटसन) उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब भरमगौडा पाटील (वय ९३) यांचे आज पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्तबगार चिरंजीव सचिन व तुषार, विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे, बंधू प्रभाकर पाटील आणि बहिण शालिनी लडगे असा मोठा परिवार आहे.
मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेचे पंचवीस वर्षांहून अधिक काळ ते चेअरमन म्हणून कार्यरत होते. सुंदराबाई पाटील बी.एड. कॉलेज, महावीर भवन आणि जैन समाजाच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या निधनाने एका थोर उद्योगसमूहाचा पाया रचणारे, दूरदृष्टी असलेले आणि समाजकार्यात सदैव पुढे असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता शाहापूर समूह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
