खरिप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी हिम्मत न हारता रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. शहापूर, येळ्ळूर, अनगोळसह परिसरातील शिवारात प्रसिद्ध असलेला वाटाणा, मसूर, मोहरी यांसह कळशीने पाणी घालून घेतली जाणारी काकडी, फूट्टी, दोडका, ढोबळी मिरची, वांगी आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. शेतात खणलेल्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्यावरही विविध पिके घेतली जात आहेत.
मात्र, अलीकडील बदलत्या व खराब हवामानामुळे विविध पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेषतः काकडी, दोडका व फूट्टीच्या वेलांवर मोठ्या प्रमाणात किड आढळून येत असून त्यामुळे फुले व फळांची गळती होत आहे. योग्य फवारणी कोणती करावी, याबाबत शेतकरी संभ्रमात होते.
या पार्श्वभूमीवर बेळगाव फलोत्पादन विभागाचे कृषी सहाय्यक काशिनाथ पाटील यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला. त्यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पिकांची पाहणी करत मार्गदर्शन केले. वेलांवरील किड नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस औषध स्टिकरसह वापरावे, मात्र ही फवारणी फक्त फूट्टीच्या आळ्यावरच करावी, कारण त्यावरील फळे अजून लहान अवस्थेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
काकडी पिकासाठी रासायनिक औषधांऐवजी 1000 पीपीएम निम तेलाची फवारणी करावी किंवा घरच्या घरी कडुनिंबाच्या पानांचा रस काढून त्याची फवारणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे पिकांचे संरक्षण तर होईलच, शिवाय ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेतच करावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच शासनाच्या विविध शेतकरी कल्याण योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी सहाय्यकांच्या प्रत्यक्ष शेतभेटीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून योग्य मार्गदर्शनामुळे पिकांवरील किड नियंत्रणात येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
