
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवश्यक तयारीचे निर्देश
बेळगाव प्रतिनिधी | डिसेंबर महिन्यात होणाऱ्या बेळगाव येथील विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपसमित्यांच्या बैठका घेण्यात येत असून बुधवारी (१२ नोव्हेंबर) सुवर्ण विधान सौध येथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली तयारी बैठक पार पडली.
या बैठकीत अधिवेशन काळात कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी उपसमित्यांना आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. अधिवेशनाच्या कालावधीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस विभागाशी सातत्याने समन्वय राखावा, तसेच सत्रासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश पास वाटप करण्याची प्रक्रिया व्यवस्थित राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अधिवेशनकाळात वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, आपत्कालीन सेवा आदी सर्व बाबींमध्ये पूर्ण दक्षता घेण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
