बेळगाव : मारिहाळ पोलिसांनी आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा स्तरावर वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल २१ चोरीची वाहने जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत ९५.५० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी मारिहाळ पोलिस ठाणे हद्दीत नीलजी क्रॉस परिसरातील एका घरासमोर उभी असलेली अशोक लेलँड मिनी गुड्स ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 144/2025 अंतर्गत BNS 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून माहिती गोळा केली असता, काही आरोपी रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी जाऊन रॉयल एनफिल्ड मोटारसायकल किंवा सुझुकी अॅक्सेस स्कूटर चोरी करत त्याच वाहनांचा वापर करून पुढे अशोक लेलँड मिनी गुड्स वाहनांची चोरी करत असल्याचे उघड झाले. चोरीची वाहने नंतर विविध व्यक्तींना विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या प्रकरणात पोलिसांनी युसुफखान सिकंदर खान (६८, धारवाड), जाकीर हुसेन मोहम्मदसाब परदेवाले (४७, धारवाड), आजाद इब्राहिम मुतवली (३६, विजापूर), शफीक अहमद रफीक अहमद (५२, वेल्लूर, तामिळनाडू) आणि बसिर अहमद मकानदार (३८, दांडेली) या पाच जणांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून पोलिसांनी
- अशोक लेलँड मिनी गुड्स ट्रक – ८
- रॉयल एनफिल्ड मोटारसायकली – ५
- सुझुकी अॅक्सेस स्कूटर – ५
- हिरो स्प्लेंडर मोटारसायकली – २
- होंडा डिओ स्कूटर – १
अशी एकूण २१ वाहने जप्त केली आहेत. या वाहनांपैकी काहींची चोरी बेळगाव, तुमकूर, दावणगेरे तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली परिसरातून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, पीएसआय मंजनाथ हुलकुंद, चंद्रशेखर तसेच सीसीबी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्तांनी या पथकाच्या कार्याचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.
