बेळगाव : बीडीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील मदीहळी गावात सोमवारी मोठा गोंधळ घडला. जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारसभेदरम्यानच त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या संचालकाला त्याच्या पत्नीनेच रस्त्यात पकडून मारहाण केली.
प्राथमिक कृषी पतसंस्था व ग्रामीण वीज सहकारी संघाच्या निवडणूक प्रचारासाठी मंत्री सतीश जारकीहोळी मदीहळी गावात दाखल झाले होते. त्या वेळी पीकेपीएस कार्यालयासमोर ही घटना घडली. मदीहळी पीकेपीएसचे सदस्य मारुती सनदी यांना त्यांच्या पत्नी लगमव्वा यांनी जनसमक्ष थप्पड मारून ओरडले.
सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिल्यामुळेच पतीला धारेवर धरल्याचे सांगितले जाते. गोंधळ एवढा वाढला की मंत्री जारकीहोळी यांनाही पती-पत्नीचा वाद शांत करणे कठीण झाले. त्यानंतर जारकीहोळी यांचे बंधूंनी मारुती सनदी यांना जबरदस्ती घेऊन गेल्याचा आरोपही समोर आला आहे.
या घटनेदरम्यान माजी खासदार रमेश कत्तीही घटनास्थळी दाखल झाले होते, ज्यामुळे दोन गट आमनेसामने येऊन वातावरण तंग झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली. अखेरीस गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बीडीसीसी बँक निवडणुकीसाठी संचालकांच्या उमेदवारी नामनिर्देशनाची सभा पुढे ढकलण्यात आली.