अवधूत गुप्तेंची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

अवधूत गुप्तेंची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या संगीत भजन स्पर्धेस सोमवारी प्रख्यात गायक, संगीतकार व चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते यांनी सदिच्छा भेट दिली. १७८ वर्षांची परंपरा लाभलेल्या या वाचनालयाने आयोजित केलेला उपक्रम ऐकून आणि अनुभवून मला अत्यंत समाधान मिळाले, असे गुप्ते यांनी यावेळी सांगितले.

भजन ऐकून मंत्रमुग्ध

भजन स्पर्धेतील एका गटाने सादर केलेल्या पहाडी सुरांनी ते मंत्रमुग्ध झाले. उपस्थित रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी “जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं” हा अभंगही सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. “आजची माझी संध्याकाळ अविस्मरणीय झाली. केवळ इतिहास महत्त्वाचा नसतो, तर त्याची छाया वर्तमानात जपली गेली पाहिजे. अशा वाचनालयामुळे ती शक्य होते,” असेही त्यांनी नमूद केले.

मान्यवरांचा सन्मान व स्वागत

वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक करून अवधूत गुप्ते यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांचे स्वागत करून स्मृतिचिन्ह अर्पण केले. कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक अभय याळगी, प्रसन्ना हेरेकर, व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक नाते दृढ होणार

“बेळगावात आम्ही एका प्रकल्पावर काम करण्यासाठी आलो आहोत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ होतील,” असा विश्वासही गुप्ते यांनी व्यक्त केला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − ten =

error: Content is protected !!