बेळगाव / प्रतिनिधी :
ए. व्ही. कराटे ॲकॅडमीची होतकरू खेळाडू तसेच समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.
दि. 21 डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित 6व्या राष्ट्रीय निमंत्रित स्तरावरील कराटे स्पर्धेत सृष्टीने कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर काता प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
यशाची मालिका पुढे सुरू ठेवत दि. 4 जानेवारी रोजी फोंडा (गोवा) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘संकुकाई कप’ कराटे स्पर्धेत तिने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई करत दणदणीत कामगिरी केली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सृष्टीला ए. व्ही. कराटे ॲकॅडमीचे प्रशिक्षक श्री. अमित वेसणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षणामुळेच तिच्या कामगिरीत सातत्य दिसून येत आहे.
सृष्टीच्या या उज्ज्वल यशाबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर आणि काँग्रेसचे युवा नेते श्री. मृणाल हेब्बाळकर यांनी तिचे विशेष कौतुक केले असून तिच्या भावी वाटचालीस सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ए. व्ही. कराटे ॲकॅडमीचे प्रशिक्षक, पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनी सृष्टीचे अभिनंदन करत तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
