आर्ष विद्या आश्रमात गोकुळाष्टमी व रक्षाबंधन उत्साहात
भारत विकास परिषदेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने टिळकवाडीतील आर्ष विद्या आश्रम येथे गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधन हा दुहेरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आश्रमात महाराष्ट्र, कर्नाटक तसेच मणिपूर राज्यातील ४५ अनाथ मुलींचे शिक्षण व संगोपन केले जाते.
प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व स्पष्ट केले. उमा यलबुर्गी यांनी श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन वातावरण प्रसन्न केले. आश्रमातील मुलींनी भक्तिगीते सादर केली तसेच सदस्यांना राखी बांधून ओवाळणी करून उत्सव साजरा केला.
या प्रसंगी भारत विकास परिषदेच्यावतीने आश्रमास आर्थिक साहाय्य करण्यात आले. प्रिया पाटील, पूजा पाटील व तृप्ती देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, विनायक घोडेकर, कुमार पाटील, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, पी. जे. घाडी, सुभाष मिराशी, रजनी गुर्जर, जया नायक, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, उमा यलबुर्गी, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, गीता बागेवाडी, शालिनी नायक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.