बेळगाव, वडगाव | आनंदनगर वडगाव येथील दुसऱ्या क्रॉस परिसरातील मुख्य रस्त्यावरील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्ता अंधारात गेल्याने स्थानिक नागरिक, विशेषतः महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. भटक्या कुत्र्यांचा वावर आणि वाहनांची ये-जा यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांनी इ- स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट कंट्रोल रूमशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती, त्यावर ४८ तासात दुरुस्ती होईल असे उत्तर देण्यात आले. मात्र १० दिवस उलटून गेले तरीही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
याशिवाय, वडगाव स्मशानभूमी रस्त्यावरही पथदीप बंद आहेत. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यानं अडचणी वाढल्या आहेत.
🔴 महत्त्वाचं म्हणजे – स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी याकडे अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही पालिका व लोकप्रतिनिधी दोघेही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत, असा संतप्त सूर स्थानिकांमध्ये आहे.
📢 नागरिकांची मागणी:
महापालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून पथदीपांची दुरुस्ती करावी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत.