गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ३०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत बेळगावची स्केटर अमिषा वेर्णेकर हिने शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली.
अमिषाच्या या यशामुळे बेळगाव जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा नावलौकिक झाला आहे. तिच्या सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीचे हे फलित मानले जात आहे.
अमिषा ही के. एल. ई. सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक तसेच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सराव करत असून तिला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि पाठबळही तिला मिळत आहे.
अमिषाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
