राज्यातील हवेची गुणवत्ता चिंताजनक; बेळगाव व उडुपीत AQI झपाट्याने घसरला

राज्यातील हवेची गुणवत्ता चिंताजनक; बेळगाव व उडुपीत AQI झपाट्याने घसरला

बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांपासून खराब अवस्थेत असलेली हवेची गुणवत्ता आज काहीशी सुधारलेली दिसून आली असली, तरी राज्यातील इतर शहरांमध्ये मात्र परिस्थिती गंभीर होत चालली आहे. विशेषतः बेळगाव आणि उडुपी येथे हवेच्या गुणवत्तेत अचानक मोठी घसरण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला असून, ही स्थिती कायम राहिल्यास फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार वाढण्याची शक्यता आहे.

आजच्या आकडेवारीनुसार बेळगावचा AQI 170 तर उडुपीचा AQI 166 नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपासून वाढत असलेली प्रदूषणाची पातळी आता ‘अनहेल्दी’ श्रेणीत पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर येथील वातावरण दिल्लीसारखे गंभीर होऊ शकते. या प्रदूषित हवेमुळे दमा, फुफ्फुसाचा कर्करोग तसेच हृदयविकारांचा धोका वाढतो आहे.

दरम्यान, बंगळुरूमध्ये आज AQI 142 पर्यंत खाली आल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निकषांनुसार ही पातळी अजूनही आरोग्यास घातकच आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडी चढ-उतार असली, तरी एकूण चित्र चिंताजनक आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, PM2.5 आणि PM10 हे सूक्ष्म कण आरोग्यास अत्यंत घातक आहेत. PM10 हे कण केसाच्या जाडीपेक्षा सुमारे सातपट सूक्ष्म असतात, तर PM2.5 हे मानवी केसाच्या जाडीच्या केवळ ३ टक्के इतके अतिशय सूक्ष्म कण असतात. श्वासोच्छवासातून हे कण थेट फुफ्फुसात जाऊन रक्तप्रवाहात मिसळतात. आजच्या आकडेवारीनुसार PM2.5 ची पातळी 84 तर PM10 109 पर्यंत वाढलेली आहे. याचा थेट परिणाम श्वसनसंस्थेवर होतो.

आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. बाहेर जाताना मास्कचा वापर, वाहनांचा वापर कमी करणे आणि शहरात हिरवळ वाढवणे हे आता अत्यावश्यक बनले आहे.

आजची राज्यातील प्रमुख शहरांची हवा गुणवत्ता (AQI):
बंगळुरू – 142
मंगळुरू – 169
मैसूर – 144
बेळगाव – 170
कलबुर्गी – 152
शिमोगा – 157
बेल्लारी – 153
हुबळी – 158
उडुपी – 166
विजयपूर – 157

AQI म्हणजे काय?
0–50 : चांगली
50–100 : मध्यम
100–150 : खराब
150–200 : अपायकारक
200–300 : गंभीर
300–500+ : अतिधोकादायक

राज्यातील वाढते वायुप्रदूषण हे गंभीर इशारा देणारे असून, नागरिकांसह प्रशासनानेही तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =

error: Content is protected !!