बेळगाव – वेळेवर पगार न होणे आणि अनाठायी वेतनकपात या कारणांमुळे लक्ष्मी टेक येथे पाणीपुरवठा विभागातील वॉलमन यांनी आज गेटबंद आंदोलन छेडले. सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाची दखल घेत एल अँड टी कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलक वॉलमन यांच्याशी चर्चा करून समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महापालिका मुख्य अभियंता सौ. लक्ष्मी निपाणीकर स्वतः उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी वॉलमन यांना सायंकाळपर्यंत पगार त्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले. तसेच पुढील काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला पगारासाठी थांबावे लागणार नाही, यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वॉलमन यांच्या वतीने मल्लेश चौगुले यांनी चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यास भाग पाडले. शेवटी महापालिका मुख्य अभियंत्यांच्या खात्रीशीर आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर गेट उघडण्यात आला आणि नियमित कामकाज सुरळीत सुरू करण्यात आले.
