कर्नाटक राज्य रयत संघाचं गेटबंद आंदोलन — उसाला महाराष्ट्रासारखा साडेतीन हजार रुपये भाव देण्याची मागणी
बेळगाव │ महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही ऊसाला साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि शेतकऱ्यांनी आज निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे गेटबंद आंदोलन छेडले. प्रशासन, कारखानदार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि संतप्त शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले.
कर्नाटकात सध्या उसाला केवळ ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर जाहीर करण्यात आला आहे, तर शेजारील महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या हितार्थ ३,५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातही तितकाच किंवा किमान ३,३०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे.
मात्र आज झालेल्या बैठकीत प्रशासन आणि कारखानदारांकडून केवळ ५० रुपयांचीच वाढ जाहीर करण्यात आली, ज्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गेटबंद आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान बैठकीसाठी उपस्थित अधिकारी, कारखानदारांचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी काही काळासाठी अडकल्याचेही वृत्त आहे.
शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी सरकारवर तीव्र टीका करत सांगितले, “केवळ ५० रुपयांची वाढ देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात आली आहे. ही अन्यायकारक वागणूक आम्ही सहन करणार नाही.” त्यांनी इशारा दिला की, उद्यापर्यंत योग्य तो दर जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की ऊस दर ठरवताना शेतमालाचा वाढता खर्च, खतांच्या किंमती, मजुरी आणि हवामानाचा परिणाम या सर्व बाबींचा विचार केला जावा. दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट प्रांगणात अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी , कारखानदारांचे प्रतिनिधी यांची वाहने अडकून आहेत.
(बेळगाव प्रतिनिधी — बेधडक बेळगाव)
