कोल्हापूर | 13 ऑक्टोबर 2025
आज कोल्हापूर येथे सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशील माने यांची मराठी भाषिक सीमाभागीय सभासदांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने सीमाप्रश्नासंदर्भात खासदार माने यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश पाळणे हे कर्नाटक शासन आणि विशेषतः बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे एक नोव्हेंबर काळा दिन कार्यक्रमाला विरोध करणे अथवा निर्बंध लादणे हे न्यायालयाचा अवमान ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार माने यांनी पुढे सांगितले की, ते एक नोव्हेंबरच्या मराठी भाषिकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, तसेच लवकरच भव्य सीमा परिषद घेऊन सीमाभागीय प्रश्नावर मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या शिष्टमंडळात प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या सोबत महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, युवा म.ए. समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, तसेच उदय शिंदे, राजकुमार मिस्त्री, प्रताप पाटील, बाबासाहेब मगदूम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
