बेळगाव │ रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार बाहेर काढताना सिक्युरिटी गार्डला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना न्यू गुड्सशेड रोड परिसरात घडली असून या प्रकरणाची नोंद वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात झाली आहे.
मृत गार्डचे नाव नागेश शटुप्पा देवजी (वय ५६, रा. माळी गल्ली, बेळगाव) असे आहे. रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता अपार्टमेंटमधून कार बाहेर काढताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नागेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
