बेळगाव – विजयनगर भागातील वेंगुर्ला रस्त्यावर आज सकाळी सरकारी कागदपत्रांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून आला. या कागदपत्रांवर सही, शिक्के तसेच पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे शेरा स्पष्टपणे दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कागदांचा खच पडलेला असून, हे कागद नेमके कसे आणि कुठून पडले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होत आहे, तर अनेकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
प्राथमिक पाहणीत ही कागदपत्रे अलीकडच्या काळातील असल्याचे दिसून येत असून, त्यावरील संवेदनशील माहितीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. संबंधित खात्याने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
