बेळगाव (प्रतिनिधी):
भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक सहाय्य आयुक्त कार्यालयाकडून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना १८ ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अधिकृत भेटीचा अभ्यास अहवाल (Study Report) तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चेन्नई येथील सहाय्य आयुक्त एस. शिवकुमार यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या कार्यालयाने यापूर्वी १४ मार्च, ३० जून आणि २५ जुलै २०२५ रोजी संबंधित पत्रे पाठवून अहवालाबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप Action Taken Report सादर न झाल्याने ती लवकरात लवकर पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.
या अहवालात बेळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्याकांसाठी राबविलेल्या सुरक्षा उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत माहिती समाविष्ट आहे. संबंधित अहवाल भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांपुढे सादर केला जाणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आग्रही, तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती या तिन्ही संघटनांच्या अध्यक्षांना पाठविण्यात आली आहे.
या पत्रामुळे बेळगावातील मराठी भाषिक समाजाच्या मागण्यांना पुन्हा एकदा केंद्राच्या स्तरावर महत्त्व प्राप्त झाले असून, भाषिक अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी पुढील घडामोडींना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
