बेळगाव (प्रतिनिधी) :
कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या सामाजिक व शैक्षणिक जनगणतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हलगा गावातील कोणत्याही नागरिकाची जनगणती चुकू नये यासाठी हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाच्यावतीने प्रत्येक घरोघरी जाऊन विचारपूस करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही सामाजिक व शैक्षणिक जनगणती अत्यंत महत्त्वाची असून, कोणताही नागरिक या प्रक्रियेतून वंचित राहू नये, यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे. सकल मराठा समाज बेळगावच्या आवाहनानंतर हलगा मराठा समाज सुधारणा मंडळाने जनगणतीची पडताळणी मोहिम हाती घेतली आहे.
या अभियानांतर्गत कार्यकर्ते घराघरांत जाऊन जनगणती झाली आहे की नाही याची खात्री करत आहेत. जनगणतीत चुकून वगळल्या गेलेल्या नागरिकांची नावे, विद्युत मीटर क्रमांक, तसेच यूएचआयडी क्रमांक नोंदवून स्वतंत्र यादी तयार केली जात आहे. ही यादी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करून, १० ऑक्टोबरपूर्वी त्या नागरिकांची जनगणती पूर्ण करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे.
या वेळी अध्यक्ष यल्लाप्पा सामजी, पुंडलिक मास्तमर्डी, पिराजी मोरे, शिवाजी संताजी, सदानंद बिळगोजी, मनोहर संताजी, गणपत मारिहाळकर, अनिल शिंदे, सागर बिळगोजी, भुजंग सालगुडे, निलेश संताजी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोहिमेमुळे हलगा गावातील एकही नागरिक सामाजिक व शैक्षणिक जनगणतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मराठा समाज सुधारणा मंडळाने व्यक्त केला आहे.
