नऊ वर्षांनंतर न्याय : काळा दिनाच्या पोस्टप्रकरणी केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर निर्दोष मुक्त

नऊ वर्षांनंतर न्याय : काळा दिनाच्या पोस्टप्रकरणी केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर निर्दोष मुक्त

📰 नऊ वर्षांनंतर न्याय : काळा दिनाच्या पोस्टप्रकरणी केदार करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर निर्दोष मुक्त

बेळगाव, ६ ऑक्टोबर २०२५ –
२०१६ साली काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मराठी एकीकरण आणि संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ संदेश शेअर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तब्बल नऊ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. बेळगाव येथील जे.एम.एफ.सी. तिसरे न्यायालय यांनी केदार करडी, मारुती पाटील आणि दत्ता येळ्ळूरकर या तिघांची निर्दोष मुक्तता केली असून जप्त मोबाईल फोन परत देण्याचे आदेश दिले आहेत.

एक नोव्हेंबर २०१६ रोजी मराठी जनतेला “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “आम्ही चाललोय तुम्ही पण या” तसेच “रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे” असे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून सीमा भागातील मराठी भाषिकांना काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोस्टमुळे दोन भाषांमध्ये तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत खडेबाजार पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक सातेनहळी यांनी स्वतःच फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी तिघा युवकांना अटक करून त्यांचे मोबाईल जप्त केले होते. मात्र, दीर्घ न्यायप्रक्रियेनंतर गुन्हा सिद्ध न झाल्याने अखेर न्यायालयाने तिघांनाही निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणात बचाव पक्षाची बाजू ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. रिचमॅन रिकी, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. स्वप्निल नाईक आणि ॲड. प्रज्वल अथणी मठ यांनी प्रभावीपणे मांडली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठी समाजात आनंद आणि समाधानाचे वातावरण असून, “सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होऊ शकतो, पण सत्य आणि न्याय कायम उभा राहतो,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 6 =

error: Content is protected !!