बेळगाव – कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक जनगणतीत (सर्वे) मराठा कुणबी समाजातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या या सर्वेमध्ये अनेक ठिकाणी काही नागरिकांची अद्याप जनगणती झालेली नाही. अशा नागरिकांनी आपले रेशन कार्ड, विद्युत मीटर क्रमांक तसेच दरवाज्यावर लावलेला यूएचआयडी क्रमांक घेऊन संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे जनगणतीसाठी विचारणा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या बाबतीत जागरूक राहून जनगणती न झालेल्या नागरिकांची यादी तयार करून ती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकाश मरगाळे यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, जनगणतीच्या वेळी —
👉 धर्म: हिंदू (कॉलम 8, कोड क्रमांक 1)
👉 जात: मराठा (कॉलम 9, कोड क्रमांक A-0940)
👉 उपजात: कुणबी (कॉलम 10, कोड क्रमांक A-0790)
👉 मातृभाषा: मराठी (कॉलम 15, कोड क्रमांक 6)
असे अचूक नमूद करावे. विशेषतः “उपजात – कुणबी (A-0790)” या कोडची नोंद काळजीपूर्वक करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही जनगणती प्रक्रिया १० ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, सर्व नागरिकांनी वेळेत आपली माहिती नोंदवून घ्यावी आणि आपल्या समाजाचे अचूक प्रतिनिधित्व सुनिश्चित करावे, असे आवाहन मरगाळे यांनी केले आहे.
