बेळगाव, ५ ऑक्टोबर २०२५ – उत्तर कर्नाटकातील नेत्ररोगशास्त्र क्षेत्रातील दोन प्रतिष्ठित संस्था — हुबळी येथील डॉ. एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूट आणि बेळगाव येथील डॉ. कोडकनीज आय सेंटर (KEC) — यांनी एकत्र येत “युनायटेड फॉर व्हिजन” या संकल्पनेअंतर्गत ऐतिहासिक विलीनीकरणाची घोषणा केली. हा समारंभ बेळगावातील काकती येथील वुडरोज बँक्वेट्स अँड हॉटेल येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. डॉ. शिल्पा कोडकनी यांनी एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ. एम. एम. जोशी, डॉ. ए. एस. गुरुप्रसाद, डॉ. सत्यमूर्ती, डॉ. आर. कृष्णप्रसाद आणि डॉ. श्रीनिवास जोशी यांची ओळख करून दिली. त्या म्हणाल्या की, “या विलीनीकरणामुळे २००० साली सुरू झालेल्या केईसीच्या दीर्घकालीन दृष्टीला आज नवा आयाम प्राप्त झाला आहे. पुढील २५ वर्षे आम्ही तंत्रज्ञान, व्यापक नेत्रसेवा आणि नैतिकतेचा उत्तम संगम घडवू.”
यानंतर दोन्ही संस्थांच्या कार्यप्रवासावर आधारित प्रेरणादायी व्हिडिओ सादर करण्यात आला आणि नव्या एकत्रित संस्थेचा लोगो अनावरण करण्यात आला.
डॉ. ए. एस. गुरुप्रसाद, डॉ. सत्यमूर्ती, डॉ. आर. कृष्णप्रसाद आणि डॉ. श्रीनिवास जोशी यांनी या विलीनीकरणामुळे उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची माहिती दिली. यात झीमर ८ रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीद्वारे स्माईल (क्लीअर) तंत्रज्ञान, प्रगत रेटिनल लेसर व शस्त्रक्रिया सुविधा तसेच बालरोग नेत्ररोग, कॉर्नियल ट्रान्सप्लांट आणि स्क्विंट उपचारांसाठी विशेष केंद्र यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर बी. कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी व कुलपती, काहेर) यांनी या सहकार्याचे कौतुक करत म्हणाले की, “डॉ. शिल्पा कोडकनी आणि डॉ. एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूट यांच्या या पुढाकारामुळे बेळगावकरांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा आपल्या शहरातच मिळणार आहे.”
सन्माननीय अतिथी श्री. राजू सेठ (आमदार, बेळगावी उत्तर) यांनीही या विलीनीकरणामुळे मतदारसंघातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. विशेष पाहुणे श्री. माधव गोगटे (एमडी, गोगटे ग्रुप) आणि श्री. अनिश मेत्राणी (एमडी, स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. लि.) यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी ९१ वर्षीय पद्मश्री डॉ. एम. एम. जोशी यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल आणि समाजकार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बेळगाव ऑप्थॅल्मिक असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच विविध संघटनांचे नेत्रतज्ज्ञ, डॉक्टर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. ए. एस. गुरुप्रसाद यांनी आभार मानले, आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
