श्रद्धा, भक्तिभाव आणि शिस्तबद्धतेने पार पडला बेळगावचा ऐतिहासिक उत्सव
बेळगाव – मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने बेळगाव शहरात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पार पडलेला नवरात्र दसरा उत्सव अत्यंत भक्तिभावाने, शिस्तबद्ध आणि उत्साहमय वातावरणात संपन्न झाला. दहा दिवस चाललेल्या या भव्य उत्सवात कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र आनंद, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण दिसून आले.
महामंडळाच्या वतीने बेळगाव शहरातील सर्व नागरिक, विविध देवस्थान मंडळाचे पदाधिकारी, भक्त मंडळे आणि सर्व भक्त यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सह-पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, कॅन्टोनमेंट बोर्ड, अग्निशमन दल, हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय अधिकारी, पत्रकार, प्रसारमाध्यमे, पेंडॉल डेकोरेटर, साऊंड सिस्टिम सहकारी तसेच महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून “जाईंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन” आणि सफाई कामगारांनी तत्परतेने रस्ते स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे रक्षण केले, त्याबद्दल महामंडळाने त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
या उत्सवाने बेळगावच्या वैभवात आणि कीर्तीत भर घालून नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित केले आहे.
या आभारप्रदर्शन प्रसंगी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, स्वागत अध्यक्ष मालोजीराव अष्टेकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी, उपाध्यक्ष दत्ता जाधव आणि कार्याध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
