‘दसरा कर्नाटक केसरी 2025’ विजेता कामेश पाटील यांसह युवा पैलवान व श्रुती पाटील यांचा सत्कार
बेळगाव – कित्येक दशकांनंतर बेळगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल करणाऱ्या पैलवान कामेश पाटील यांनी मैसूर दसरा स्पर्धेत ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी 2025’ हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या यशासह या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर दहा युवा पैलवानांचा आणि कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या श्रुती पाटील यांचा सत्कार सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने करण्यात आला.
हा सत्कार समारंभ रविवारी, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठा समाजाचे देवस्थान श्री जत्तीमठ, बेळगाव येथे पार पडला. यावेळी नुकतेच काडा अध्यक्षपदी निवड झालेले युवराज कदम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात किरण जाधव, शरद पाटील, अमर यळूरकर, महादेव पाटील, नगरसेविका रेश्मा पाटील, माधुरी जाधव, सुनील जाधव, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
मैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पैलवानांमध्ये कामेश पाटील (कंग्राळी खुर्द), प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द), महेश बिर्जे (तीर्थ कुंडये), विनायक पाटील (येळूर), समर्थ डुकरे (किणये), स्वाती पाटील (कडोली), प्रांजल तुळजाई (अवचारट्टी), भक्ती पाटील (कंग्राळी), सानिका हिरोजी कलखांब (आंबेवाडी) आणि अनुश्री चौगुले (अलतगा) या पैलवानांचा गौरव करण्यात आला.
बेळगावच्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमात पैलवान आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक श्रुती पाटील यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.
